GRAMIN SEARCH BANNER

कामथे नदीपात्रात हॉस्पिटलचा घातक वैद्यकीय कचरा; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट,कठोर कारवाईची मागणी

Gramin Varta
136 Views

चिपळूण : तालुक्यातील कामथे येथील नदीपात्रात अज्ञात रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणावर घातक वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बेजबाबदार प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून कामथे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कामथे गावातील हा नदी परिसर लोकवस्तीच्या अगदी जवळ असून दैनंदिन वापरासाठी, कपडे धुण्यासाठी आणि गुरांना पाणी पाजण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या नदीकाठावर येत असतात. अशा गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया तसेच संसर्गजन्य ठरण्याची शक्यता असलेले विविध प्रकारचे जैववैद्यकीय साहित्य उघड्यावर टाकण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा गंभीर प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर कामथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नदीपात्रात अशा प्रकारे घातक वैद्यकीय कचरा टाकणे हे पर्यावरणीय नियमांचे उघड उल्लंघन असून यामुळे लहान मुले, महिला आणि पाळीव जनावरांना संसर्गजन्य आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, हा कचरा कोणत्या रुग्णालयातून किंवा संस्थेतून आणून टाकण्यात आला याचा तत्काळ शोध घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कामथेवासीयांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3483537
Share This Article