पावसाच्या सरींसह पारंपरिक मासेमारीला वेग; लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह
रत्नागिरी : मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसानंतर ग्रामीण भागातील ओढे, नाले आणि पाणवठे जिवंत झाले असून गावठी कुरळ्या पकडण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी हातात जाळी, टोपल्या आणि पारंपरिक साधने घेऊन ग्रामस्थ कुरळ्या पकडण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाजवळ गर्दी करताना दिसत आहेत.
पहिल्या पावसाच्या पाण्याबरोबर कुरळ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने त्यांना पकडण्याची ही संधी ग्रामस्थ सोडत नाहीत. विशेषतः कोकणातील ग्रामीण भागात ही केवळ मासेमारी नसून अनेक वर्षांपासून जपली गेलेली एक पारंपरिक जीवनशैली मानली जाते. लहान मुले, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या गावठी कुरळ्यांना बाजारातही चांगली मागणी असते. त्यामुळे काही जण हौसेपोटी तर काही जण अतिरिक्त उत्पन्नासाठी कुरळ्या पकडत आहेत. पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि कुरळ्या पकडण्याची लगबग यामुळे ग्रामीण भागात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या पावसाबरोबर सुरू झालेली ही पारंपरिक लगबग आगामी काही दिवस कायम राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
गावठी कुरळ्यांसाठी ग्रामीण भागात गोणते, पिशव्या घेऊन चढाओढ






