राजापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धडक मोहीम; ३९७ धोकादायक ठिकाणांना नोटिसा

Gramin Varta
106 Views

राजापूर : पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि जीवितहानी टाळण्यासाठी राजापूर पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील धोकादायक झाडे, जीर्ण इमारती आणि दरडीचा धोका असलेल्या परिसराची पाहणी करून प्रशासनाने एकूण ३९७ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेत प्रामुख्याने ३७ धोकादायक झाडांचे मालक, ५७ जीर्ण इमारतींचे मालक, तर पावसाळ्यात अतिसंवेदनशील ठरू शकणाऱ्या ३०३ अशा एकूण ३९७ ठिकाणच्या नागरिकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास होणाऱ्या जीवित व वित्तहानीची जबाबदारी शासन किंवा प्रशासनावर राहणार नाही, याची स्पष्ट जाणीव या नोटिसांद्वारे संबंधितांना करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरात सतर्कतेचे वातावरण असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Total Visitors :
4827061
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *