कोकणातील प्रकल्प रद्द करा आणि पीक विम्याचे जाचक निकष बदला; आंबा-काजू बागायतदारांची खासदार नारायण राणेंकडे मागणी

Gramin Varta
79 Views

रत्नागिरी : कोकणातील शेती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्प तातडीने रद्द करावेत, तसेच पीक विम्याच्या जाचक अटींमध्ये त्वरित सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंबा-काजू बागायतदारांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थे’चे नेते बावा साळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या समस्यांकडे लक्ष वेधले.

कोकणच्या मातीत कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, मात्र त्यासोबतच विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करणारे प्रकल्प नकोत, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली. देवगड, जैतापूर, बारसू, पूर्णगड आणि वाटद यांसारख्या संवेदनशील भागात प्रस्तावित असलेले रासायनिक प्रकल्प पूर्णपणे बंद करून, त्याऐवजी शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन किंवा आंबा-काजू संशोधन केंद्रांची उभारणी करावी, असा आग्रह बागायतदारांनी धरला आहे.

या भेटीदरम्यान पीक विमा योजनेतील त्रुटींवरही जोरदार चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीतील विमा निकष कोकणातील बागायतदारांच्या हिताचे नसून, नुकसान भरपाईसाठी सक्तीची ‘ई-पीक पाहणी’ किंवा ‘फार्मर आयडी’ची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विम्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याऐवजी शासनाने नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, पीककर्जाचे नियम शिथिल करून प्रति झाड पाच हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि व्याज अनुदानाची मर्यादा वाढवून ती एक लाखापर्यंत करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या वेळी रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ आणि पावस परिसरातील बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *