रत्नागिरी : जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आता बचत गटांमार्फत आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला बचत गटांना या कामाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील २०० पेक्षा कमी खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था महिला बचत गटांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यापूर्वी रुग्णालयांमधील आहार पुरविण्याचे काम बहुतांश ठिकाणी खासगी कंत्राटदारांकडे होते. मात्र नव्या निर्णयामुळे ही जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देणे हा आहे. रुग्णालयातील भोजन व्यवस्थेचे काम मिळाल्याने बचत गटांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. त्याचबरोबर स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या कामासाठी बचत गटांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाणार असून, संबंधित गटाला ठरावीक निकष पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. नोंदणीकृत महिला बचत गटाला किमान तीन वर्षांचा कार्यानुभव असणे गरजेचे आहे. तसेच गटाचे बँक खाते, अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षिततेसंबंधी आवश्यक बाबी पूर्ण असणे अपेक्षित आहे.
निवड झालेल्या बचत गटाला प्रत्येक रुग्णामागे दररोज १११.४० रुपये मिळणार आहेत. या रकमेत सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा तसेच रात्रीचे जेवण यांचा समावेश असेल. रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराचे नियोजन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहे.
या योजनेत बचत गटांच्या कामकाजाचा अनुभव, आर्थिक व्यवहार, स्वच्छता व अन्नसुरक्षेची अंमलबजावणी तसेच स्थानिक महिलांचा सहभाग यांसारख्या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर आहार मिळण्याबरोबरच महिला बचत गटांना उत्पन्नाचे स्थिर साधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






