GRAMIN SEARCH BANNER

राजापूर शहरात लोकवर्गणीतून उभी राहणार पोलिस चौकी

राजापूर : बुधवारी झालेल्या गाळ निर्मूलन समितीच्या सभेत लोकवर्गणीतून जमा झालेल्या उर्वरित निधीतून शहरातील जवाहर चौक येथे पोलिस चौकी उभारण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही चौकी उभारण्यात येणार आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी नाम फाउंडेशन, इमेन्स फाउंडेशन तसेच जागरूक नागरिकांच्या लोकवर्गणीतून कोदवली नदीतील गाळ उपसा मोहिम हाती घेण्यात आली होती. या उपक्रमात नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला होता. त्यानंतर यंदा पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून शासनस्तरावर गाळ उपसा झाला. यामुळे शहरात पुराच्या पाण्याचा धोका कमी झाल्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

बैठकीत लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा हिशोब मांडण्यात आला. इमेन्स फाउंडेशनमार्फत झालेल्या ऑडिटनुसार २ लाख १७ हजार रुपये शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम शहरवासीयांच्या हितासाठी वापरली जावी, या उद्देशाने पोलिस चौकी उभारण्याचा ठराव घेण्यात आला.

बैठकीस नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, व्यापारी संघ अध्यक्ष संदीप मालपेकर, डॉ. उत्तम प्रभुदेसाई, इमेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष मजिद पन्हळेकर, पत्रकार महेश शिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पोलिस चौकीसाठी पुढाकार घेण्याचे ठरवले.

निर्माण होणारी ही पोलिस चौकी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सज्ज असेल. यामध्ये आवश्यक विद्युत व्यवस्थेची जबाबदारी नगर परिषदेकडे असेल. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Total Visitor Counter

2475437
Share This Article