राजापूरच्या सोल्ये परिसरात कोयता घेऊन घरात घुसलेल्या तरुणाला ग्रामस्थांनी चोपले

Gramin Varta
850 Views

राजापूर : राजापूर तालुक्यातील सोल्ये परिसरात बुधवारी सायंकाळी एका अनोळखी तरुणाने कोयता आणि घन हातात घेऊन घरात घुसल्याने मोठा थरार पाहायला मिळाला. मुंबईहून मांडवी एक्सप्रेसने आलेला हा तरुण रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पोलिसांना पाहून फणसवाडी येथील प्रकाश शृंगारे यांच्या घरात शिरला. यावेळी घरात शृंगारे यांची आई एकटीच होती, तर इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरात शिरताच या तरुणाने दरवाजा आतून बंद करून घेतला आणि घरातले कोयता व घन हातात घेऊन धमकी देण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच प्रकाश शृंगारे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई व रेल्वे स्थानकावरील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याने शरण येण्यास नकार दिला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून काही धाडसी ग्रामस्थांनी घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. संतापलेल्या जमावाने त्याला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वेळेवर ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तसेच, जखमी तरुणाला पोलिसांच्या वाहनातून न नेता रिक्षातून रेल्वे स्थानकात पाठवल्याने या प्रकाराचीही परिसरात चर्चा सुरू आहे. हा तरुण नेमका कोण आहे आणि पोलिसांना पाहून तो का पळाला, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात असून, त्याचा जबाब मिळाल्यानंतर या प्रकरणाचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4577046
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *