राजापूरमध्ये पहिल्याच पावसात शिवसृष्टीचे बांधकाम कोसळले; नगराध्यक्षांचे ठेकेदारावर कारवाईचे आदेश

Gramin Varta
525 Views

राजापूर : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची तातडीने दखल घेत राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आणि कामादरम्यानच बांधकामाचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

राजापूर शहरात प्राचीन ब्रिटिशकालीन वखारीच्या जागी १ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानातून हा महत्त्वपूर्ण शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, सुरुवातीच्याच टप्प्यात बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाहणीदरम्यान बांधकामातील त्रुटी पाहून नगराध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर तक्रार जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालय विभागाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्निल पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Total Visitors :
4827846
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *