शाळा बंद पडल्याने अणसुरे ग्रामस्थ आक्रमक; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी

Gramin Varta
268 Views

राजापूर : राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील ८ वी ते १० वीचे वर्ग अचानक बंद झाल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही शाळा तातडीने पूर्ववत सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक देत सभापती नंदिनी कदम यांना निवेदन सादर केले आहे. याच मागणीसाठी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होताच शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली, मात्र त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती अद्याप झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमारे ३० वर्षांपूर्वी अणसुरे गावात मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने ही शाळा स्थापन करण्यात आली होती. गेल्या तीन दशकांत या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून, अनेक माजी विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, सरकारी अधिकारी आणि पोलीस यांसारख्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. शाळेचा दहावीचा निकाल अनेक वेळा शंभर टक्के लागला असून, गावाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्याने शाळा बंद पडल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. विशेषतः शाळेत शिक्षण घेणाऱ्या काही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे पालकांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बोलताना पालक श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी सांगितले की, त्यांची मुलगी राजनंदिनी ९७ टक्के दिव्यांग असून तिला स्वतःहून चालता येत नाही. अणसुरे हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी मुलगी शाळा अचानक बंद झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या खचली आहे. दूरच्या शाळेत दररोज ने-आण करणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिचे शिक्षण खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ मयेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने त्वरित शिक्षकांची नियुक्ती करून वर्ग पुन्हा सुरू करावेत, अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827588
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *