रत्नागिरीतील मांडवी परिसरात हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
935 Views

रत्नागिरी : शहरातील मांडवी परिसरातील ८० फटी हायवेवर असलेल्या ‘हॉटेल शिव’ येथे ११ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संध्या कोसुमकर आणि तिच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या समोर बसलेल्या गुरांना हटवताना आरोपींनी घटनास्थळी येऊन मोबाईलमध्ये शूटिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी हॉटेलच्या काउंटरवर बसलेल्या निलेश शिरधनकर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालक शिवम शिवलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी निलेश शिरधनकर यांच्या नाकावर फाईटने मारून दुखापत केली, तर शिवम शिवलकर यांच्या उजव्या हाताच्या पंजावर लोखंडी फाईटने प्रहार केला. या गोंधळात भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शिवम यांच्या काकी समिधा पिलणकर यांनाही आरोपी संध्या कोसुमकर हिने ढकलून दिल्याने त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे मांडवी परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4576765
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *