रत्नागिरी : कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, जिल्हा पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ या प्रतिष्ठित माध्यम संस्थांकडून देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा-सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, आपत्कालीन परिस्थितीत निर्णयक्षमता, सक्षम नेतृत्व तसेच पोलीस दल आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्याची क्षमता अशा विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई, नागरिकांच्या तक्रारींची तत्पर दखल आणि जनतेशी सुसंवाद यावर विशेष भर देण्यात आला आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि विविध आव्हानांनी व्यापलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता कायम ठेवताना नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करताना नागरिकाभिमुख पोलीसिंगला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीतून अधोरेखित झाली आहे. त्यामुळे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या यादीत त्यांचा समावेश होणे ही त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्यक्षमतेची दखल मानली जात आहे.
या यादीत महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याने राज्याच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील टॉप २५ पोलीस प्रमुखांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याचेही प्रसिद्ध वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या भूमीत कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस दलासाठी अधीक्षक नितीन बगाटे यांचा या प्रतिष्ठित यादीतील समावेश निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान ठरलेल्या पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचे या उल्लेखनीय सन्मानाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या यादीत समावेश
Leave a Comment





