खेड: बहिरोलीतील जलजीवन योजनेचे तीनतेरा; निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ त्रस्त, अब्दुल्ला उमर चौगुले यांची चौकशीची मागणी

Gramin Varta
167 Views

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील बहिरोली क्रमांक एक गावातील जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून, वापरण्यात आलेल्या पाईपच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाने या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बहिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामीण पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अब्दुल्ला भाई उमर चौगुले यांनी केली आहे.

बहिरोली गावासाठी काही वर्षांपूर्वी जलजीवन नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या योजनेचे काम पूर्ण झालेले नसल्याने तसेच अनेक कामे प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना अपेक्षित पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, योजनेचे काम अद्याप ग्रामपंचायत अथवा पाणीपुरवठा समितीने अधिकृतरीत्या ताब्यात घेतलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या कामासाठी वापरण्यात आलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप असून, हे पाईप वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. पावसाळ्यातही पाईप फुटल्यामुळे ग्रामस्थांना तब्बल आठ-आठ दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. त्यामुळे जलजीवन योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात आला असून, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या आणि तक्रारी घेऊन संबंधित कार्यालयात गेल्यानंतरही जबाबदार अभियंता प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय असून, प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत योजनेचे संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही योजना ग्रामपंचायत अथवा ग्रामीण पाणीपुरवठा समिती ताब्यात घेणार नसल्याची भूमिका अब्दुल्ला भाई उमर चौगुले यांनी स्पष्ट केली आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश असताना बहिरोलीतील परिस्थिती त्याला छेद देणारी असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शासनाने योजनेच्या कामाची कठोर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि बहिरोलीतील ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून न्याय द्यावा, अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.

Total Visitors :
4827288
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *