रत्नागिरी : कोकणच्या कृषी संशोधनासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशातील बागायती उपवन पिकांमधील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ म्हणून गौरविण्यात आले आहे. केरळमधील कासारगोड येथे आयोजित अखिल भारतीय समन्वित उपवन पिके संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा सभेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी हा सन्मान स्वीकारला.
गेल्या ७१ वर्षांपासून हे केंद्र नारळ पिकाच्या सुधारित वाणांचे संवर्धन, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण या विषयांवर सातत्याने संशोधन कार्य करत आहे. कासारगोड येथील वार्षिक बैठकीत केंद्राने नारळाच्या विविध वाणांच्या चाचण्या, आंतरपिकांचे नियोजन आणि प्रभावी पीक संरक्षण तंत्रज्ञान यावर सादर केलेल्या निष्कर्षांचे तज्ज्ञांकडून कौतुक करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र करत असलेल्या कार्याची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे. कोकणातील नारळ बागायतदारांसाठी हे संशोधन केंद्र एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरले असून, या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारामुळे संपूर्ण कोकणच्या कृषी क्षेत्राचा गौरव झाला आहे.
