राजापूर/ तुषार पाचलकर : तालुक्यातील पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय स्थापन व्हावे या मागणीला अधिक बळ देण्यासाठी पाचल व्यापारी संघटना, ग्रामपंचायत पाचल आणि पाचल तालुका निर्मिती कृती समिती यांची संयुक्त बैठक नुकतीच पाचल येथे पार पडली. या बैठकीत व्यापारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये झाल्यास केवळ एका गावाचा नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीचा विकास होईल, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी पाचल तालुका निर्मिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचलची बाजू सविस्तर मांडली. पाचल हे अनेक वर्षांपासून शिक्षण, व्यापार, बँकिंग, कृषी सेवा, शासकीय सुविधा आणि दळणवळणाचे केंद्र राहिले आहे. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी पाचलमध्ये येत असतात. त्यामुळे अप्पर तहसीलदार कार्यालय येथे स्थापन झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना कृती समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, ही कार्यालयाची मागणी कोणत्याही राजकीय व्यक्तीची किंवा पुढाऱ्यांची नसून, हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या भविष्यातील विकासाचा विषय आहे.
व्यापारी वर्गाला आवाहन करताना सांगण्यात आले की, आपण सर्वप्रथम पाचलचे व्यापारी आहोत. ज्या गावामुळे आपला व्यापार उभा आहे, त्या गावाच्या विकासासाठी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अप्पर तहसीलदार कार्यालय आल्याने सर्वाधिक फायदा व्यापारी वर्गालाच होणार असून नागरिकांची वर्दळ वाढेल, नवीन व्यवसायांना चालना मिळेल, रोजगार निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनेल. या बैठकीत व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी कृती समितीने मांडलेले सर्व मुद्दे समजून घेत या लढ्यात खंबीरपणे सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना व्यापारी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमध्ये व्यापारी संघटना अध्यक्ष आण्णा पाथरे, पाचल सरपंच बाबालाल फरास सर, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल तालुका कृती समितीचे अध्यक्ष अशोक सक्रे, कार्याध्यक्ष किशोरभाई नारकर, कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर, करक सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरी गावचे माजी सरपंच सुनील जाधव, तसेच उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बाळा सावंत यांनी आपली मते व्यक्त केली. बैठकीत विरोधकांकडून पसरविण्यात येत असलेल्या पाचलमध्ये शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध नाही या दाव्याचाही उल्लेख झाला. कृती समितीने उपलब्ध जागांबाबतची माहिती आणि त्यासंदर्भातील पुरावे उपस्थितांसमोर सादर केले. त्यामुळे हा दावा वस्तुस्थितीवर आधारित नसून केवळ अफवा असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. उपस्थित व्यापाऱ्यांनीही याबाबत समाधान व्यक्त करत जनतेमध्ये केवळ सत्य आणि तथ्यांवर आधारित माहितीच पोहोचविण्याचा निर्णय घेतला.
सरपंचांनी व्यापारी वर्गाशी संवाद साधताना सांगितले की, ज्या गावात आपण व्यापार करतो, त्या गावाशी आपली नाळ कायम जोडली असली पाहिजे. पाचल ग्रामपंचायत व्यापारी वर्गाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात आजवर सहकार्य करत आली आहे आणि भविष्यातही हे सहकार्य कायम राहील. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल. त्यांनी पुढे सांगितले की, आज पाचलमध्ये जी मोठी बाजारपेठ उभी आहे, ती येथे उपलब्ध असलेल्या जागेमुळे आणि गावाच्या नियोजनबद्ध विकासामुळेच शक्य झाली. परिसरातील अनेक गावांतील नागरिक येथे स्थायिक झाले, व्यापार वाढला आणि पाचल पंचक्रोशीचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. त्यामुळे पाचलमध्ये जागाच नाही हा दावा वस्तुस्थितीला धरून नाही.
बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनीही आपली मते मांडली. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये आल्यास केवळ व्यापाऱ्यांचाच नव्हे, तर शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रशासकीय कामांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या शेवटी पाचल व्यापारी संघटनेने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली की, पाचल व्यापारी संघटना गावाच्या न्याय्य हक्कासाठी सदैव कृती समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. ही लढाई कोणाच्या विरोधातील नसून विकासासाठीची आहे. वेळ आली तर न्याय मिळवण्यासाठी व्यापारी वर्गही सक्रियपणे सहभागी होईल आणि गावाच्या हितासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. या संयुक्त बैठकीमुळे व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत आणि कृती समिती यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये स्थापन झाल्यास प्रशासकीय सुविधा गावाच्या दारात येतील, व्यापाराला नवी उभारी मिळेल आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.






