GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र आता ‘क्वांटम कॉरिडॉर’च्या नकाशावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
34 Views

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.

आयओएनक्यू, मेरीलँड, अमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी ॲमेझॉन ब्रॅकेट, मायक्रोसॉफ्ट अझ्यूर आणि गुगल क्लाउड यासारख्या क्लाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओआयओएनक्यूचे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधन, लॉजिस्टिक्स, फायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेग, अचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठी हे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.

स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम-वर्धित ऑप्टिमायझेशन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश करून शाश्वत आणि स्मार्ट पायाभूत सुविधा विकसित करत आहे.

या सांमजस्य करारप्रसंगी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच आयओएनक्यूचे अध्यक्ष जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलो डी. मासी, स्कैंडियन एबीचे संचालक मंडळ हन्ना फिलिपा गेरहार्डसन आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2656126
Share This Article