GRAMIN SEARCH BANNER

पोलिस पतीसह तिघांविरुद्ध पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; रत्नागिरीतील धक्कादायक घटना

Gramin Varta
372 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात एका महिलेला तिच्या पोलीस असलेल्या पतीने, नणंदेने आणि एका अल्पवयीन मुलीने सातत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी पोलीस पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरती नीलेश भागवत (वय ३७, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

आरती भागवत यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे नीलेश सुरेश भागवत (वय ४२, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) यांच्याशी ३० मे २०१८ रोजी लग्न झाले. नीलेश भागवत हे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांची सध्या जयगड सागरी पोलीस ठाणे येथे नेमणूक आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सर्व ठीक असताना, २०१८ पासून पती नीलेश यांच्या स्वभावात बदल होऊ लागला.

त्यांच्या मैत्रिणींशी असलेल्या सततच्या बोलण्याबद्दल विचारणा केल्यास ते मारहाण करत असल्याचा आरोप आरती यांनी केला आहे.
या छळाला कंटाळून अखेरीस आरती यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, १५ सप्टेंबर २०२४ रोजी नीलेश भागवत यांनी आरती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, गळा दाबण्याचा प्रयत्न करत त्यांचे डोके भिंतीवर आपटून दुखापत केली. यावेळी आरती यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची नणंद दिक्षिता दिलीप यादव (रा. लांजा) आणि एक अल्पवयीन मुलगी यांनीही त्यांना हाताच्या थापडांनी मारहाण केली.

या अत्यंत गंभीर तक्रारीची दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने पोलीस नीलेश सुरेश भागवत, नणंद दिक्षिता दिलीप यादव आणि अल्पवयीन मुलगी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका पोलिसावरच घरगुती हिंसाचाराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने रत्नागिरी पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2663853
Share This Article