GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : रामपेठच्या पल्लवी शेरे यांना राज्यस्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर

Gramin Varta
134 Views

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे:  एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प देवरुख अंतर्गत रामपेठ येथील अंगणवाडी सेविका सौ. पल्लवी सचिन शेरे यांना त्यांच्या १६ वर्षांच्या उल्लेखनिय सेवेबद्दल विश्व समता कला मंच, लोवले यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून तसे निवडपत्र त्यांना प्राप्त झाले आहे. सौ. पल्लवी शेरे यांनी गेल्या १६ वर्षांच्या कालावधीत आरोग्य, लसीकरण, स्तनदा व गरोदर मातांचे मार्गदर्शन, तसेच ३ ते ६ वयोगटातील बालकांना दर्जेदार पोषण आहार आणि योग्य संस्कार देण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे केले आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करून स्वच्छतेचा संदेश मुलांमार्फत घराघरापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामपेठ अंगणवाडीत वर्षभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमशील कार्यामुळे ही अंगणवाडी वरिष्ठांच्या उत्तम अभिप्रायास पात्र ठरली आहे. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात पल्लवी शेरे यांनी रुग्णांना आवश्यक औषधे आणि जेवण पोहोचवून आपले कर्तव्य चोख बजावले होते. याशिवाय शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनेक प्रस्ताव सादर करून गरजू महिलांना लाभ मिळवून दिला असून मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांनाही त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या या सर्वंकष सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विश्व समता कला मंच या संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. लोवले येथील शुभगंधा हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता आयोजित एका विशेष सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

Total Visitor Counter

3388317
Share This Article