GRAMIN SEARCH BANNER

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवा प्रशिक्षण संपन्न; ७५ विद्यार्थ्यांनी घेतले धडे

रत्नागिरी : स्थानिक गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत समुदाय सहभाग कार्यक्रम अभ्यासक्रमाचा भाग म्हणून समाजसेवेचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण मदत केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत चार वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या बॅचमध्ये २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. १६ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याचे तांत्रिक व व्यावहारिक ज्ञान देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभाप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. कृष्णकांत खांडेकर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. शाहू मधाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, नेहा महाडिक, जागृती देशमुख, पत्रकार तथा एनजीओ जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे आणि संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर उपस्थित होते. यावेळी शकील गवाणकर यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी आयुष्यात समाजसेवेचे महत्त्व विषद केले. समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी रुग्णालयातील सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर सविस्तर माहिती दिली. प्रा. खांडेकर यांनी संपर्क युनिक फाउंडेशनद्वारे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत महाविद्यालयाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रा. शाहू मधाळे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत सर्व मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व २८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Total Visitor Counter

3434078
Share This Article