देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील शिंदेवाडी येथे एका बंद कपाटातून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने घराचे किंवा कपाटाचे कोणतेही कुलूप न तोडता, कपाटातच असलेल्या चावीचा वापर करून हा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी संतोष पाल्ये यांचे निवे बुद्रुक येथे सामाईक घर असून, घटनेच्या वेळी घरातील कपाटाच्या लॉकरची चावी तिथेच उपलब्ध होती. चोरट्याने या संधीचा फायदा घेत कपाटातील ४० हजार रुपये किमतीचा सुमारे दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार आणि ३० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा जबरी चोरीच्या खुणा आढळल्या नाहीत.
घरातील वस्तूंची आणि चाव्यांची पूर्ण माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा माहितगार व्यक्तीनेच ही चोरी केली असावा, असा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे. काही दिवस शोधाशोध केल्यानंतर अखेर २७ मार्च रोजी सायंकाळी पाल्ये यांनी देवरुख पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, घराच्या आसपास वावरणाऱ्या संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.







