GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : डॉ.राधिका जोशी यांच्या गायनाने खल्वायनच्या संगीत सभेत रंगत

Gramin Varta
64 Views

रत्नागिरी:येथील खल्वायन संस्थेची ३२३वी मासिक संगीत सभा पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांच्या शास्त्रीय तसेच अभंग-नाट्य गीत गायनाने रंगतदार झाली.

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात कै. अरुअप्पा जोशी स्मृती संगीत मैफल म्हणून साजऱ्या झालेल्या या मैफलीत सुरुवातीला मोहन पटवर्धन यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन झाले. डॉ. राधिका जोशी या जयपूर-अत्रौली घराण्याच्या एक उदयोन्मुख व प्रतिभावान गायिकेने मैफलीची सुरवात भीमपलास रागातील विलंबित तीनतालात निबद्ध असलेल्या रे बिरहा या ख्यालाने केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील एक बंदिश सादर झाली.

राग बसंत बहार रागातील गानतपस्विनी मोगूबाई कुर्डिकर यांची मान रे मान रे ही बंदिश सादर झाली. त्यानंतर वद जाऊ कुणाला शरण हे नाट्यगीत, हंसध्वनी रागातील संत एकनाथ महाराज यांचा अभंग आणि शेवटी चैती या गानप्रकारांनी त्यांनी आपल्या मैफलीचा शेवट केला. स्वच्छ स्वर लगाव आणि सहजसुंदर सुरेल गायन यामुळे मैफल रंगतदार झाली.

मैफिलीला समर्पक व उठावदार साथ संगत तबला सोहम जोशी (दापोली) व हार्मोनियम अमित ओक ( चिपळूण) यांनी केली.

Total Visitor Counter

3391871
Share This Article