GRAMIN SEARCH BANNER

शिरळ मालघर येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात; सुमित्रा महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

चिपळूण: तालुक्यातील शिरळ मालघर येथील श्री लक्ष्मी केशव देवस्थानमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रभू श्रीराम जन्मोत्सव अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध दशमी या कालावधीत चाललेल्या या उत्सवाचे यंदा १५९ वे वर्ष होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती. आपल्या माहेरच्या या उत्सवासाठी त्या दरवर्षीप्रमाणे यंदाही आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. यावर्षी मालघरच्या सुपुत्रांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा गौरव सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी नियुक्ती झालेले ॲड. मिलिंद साठे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ॲड. आरती अरुण साठे, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त गिरीधर साठे, उद्योजिका दीपा साठे-गोडबोले आणि पंचायत समिती सदस्य सौ. सायली सुनील वाजे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सुमित्रा महाजन यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्रांची कृपा लाभलेला व्यक्ती आपल्या क्षेत्रात सदैव प्रगती करतो, त्यामुळे सर्वांनी निष्ठेने कार्य करत राहावे.

उत्सवाच्या मुख्य दिवशी ह.भ.प. भाग्यश्रीताई बिवलकर यांनी राम जन्माचे कीर्तन सादर केले, ज्यानंतर मध्यान्ह समयी पुष्पवृष्टी आणि जयघोषात रामाचा जन्मोत्सव साजरा झाला. या सोहळ्यासाठी चिपळूणसह मुंबई, पुणे, नागपूर येथून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल या उत्सवात पाहायला मिळाली. यामध्ये सातारा येथील गायिका सौ. उज्वल गोडबोले यांचा ‘माणिक गीते’ हा कार्यक्रम विशेष रंगला. दशमीच्या दिवशी महाप्रसाद आणि छबिन्याच्या फेऱ्यांनंतर स्थानिक रामभक्तांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून उत्सवात रंगत आणली. मंगेश बापट यांनी या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. पहाटे लळिताच्या कीर्तनाने या दहा दिवसांच्या प्रदीर्घ आणि भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली. पुढील वर्ष हे या उत्सवाचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये आतापासूनच मोठा उत्साह दिसून येत आहे.

Total Visitor Counter

3447437
Share This Article