GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांच्या ‘RAIDS’ ॲपची कमाल; हरवलेली व्यक्ती आणि फरार आरोपीचा लावला शोध

रत्नागिरी: आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी पोलिसांनी एका हरवलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांच्या ‘RAIDS’ (रेड्स) ॲपमधील फेस रीकन्स्ट्रक्शन तंत्रज्ञान अत्यंत कळीचे ठरले आहे.

पहिल्या घटनेत ७ एप्रिल २०२६ रोजी पूर्णगड पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हालचाली करत त्यांचे छायाचित्र ‘RAIDS’ ॲपमध्ये अपलोड केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या व्यक्तीचे चेहरा पुनर्रचना (फेस रीकन्स्ट्रक्शन) करण्यात आले आणि सदर छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यांसह सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्यात आले. या तांत्रिक शोधमोहिमेमुळे पूर्णगड पोलिसांनी अल्पावधीतच त्या व्यक्तीचा यशस्वीरित्या शोध घेतला.

दुसरी महत्त्वाची कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत करण्यात आली. सन २०२२ पासून पोलीस ज्याचा शोध घेत होते, अशा आरोपीचा जुना फोटो ‘RAIDS’ ॲपमध्ये वापरून त्याचे विविध संभाव्य चेहेरे तयार करण्यात आले. या तांत्रिक विश्लेषणाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट जोधपूर, राजस्थान गाठून आरोपीला अटक केली.

या दोन्ही यशस्वी मोहिमा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. पूर्णगड येथील कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील यांच्या पथकाने, तर फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तंत्रज्ञानाच्या या यशस्वी वापरामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यासोबतच तपासाला नवी गती मिळाल्याचे बोलले जात आहे.

Total Visitor Counter

3481281
Share This Article