GRAMIN SEARCH BANNER

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली रत्नागिरीतील पिता-पुत्राची ९० लाखांची फसवणूक

रत्नागिरी: शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरी शहरातील एका २१ वर्षीय तरुणाची आणि त्याच्या वडिलांची तब्बल ९० लाख १ हजार ३०० रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ठाणे येथील एका संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील ओसवालनगर येथील अर्कान विल्ला येथे राहणारा फिर्यादी महमद अयाद अजीज वागळे आणि त्याचे वडील यांना संशयित आरोपी फैजान नुख्द्दीन शेख (रा. अमृतनगर, ठाणे) याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. संशयिताने त्यांना गुंतवणुकीच्या चार महिन्यांच्या एका विशेष योजनेची माहिती देऊन विश्वास संपादन केला. या अमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी ४ नोव्हेंबर २०२४ ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वेळोवेळी एकूण ९० लाख १ हजार ३०० रुपये ऑनलाईन पद्धतीने आणि अन्य मार्गांनी गुंतवले.

मात्र, गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही आरोपीने त्यांना कोणताही परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महमद वागळे याने १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी फैजान शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, अशा प्रकारे गुंतवणुकीचे अमिष दाखवणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3485118
Share This Article