GRAMIN SEARCH BANNER

भोस्ते घाटात तीन वाहनांचा साखळी अपघात

Gramin Varta
51 Views

रत्नागिरी : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी (दि. ४ मे २०२६) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे तीन वाहनांची साखळी धडक होऊन या अपघातात मोठे नुकसान झाले असून आरोपी चालक स्वतः जखमी झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लतिकेश सखाराम मोरे हे त्यांच्या ताब्यातील सरकारी वाहन (MH 08 BE 3391) घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्यासह चिपळूणहून खेडकडे येत होते. भोस्ते घाट उतरत असताना त्यांच्या पुढे असलेल्या ईर्टिगा (MH 07 AS 2027) गाडीला मागून येणाऱ्या (MH-43 BP-8097) वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पुढील ईर्टिगा गाडी जाऊन सरकारी वाहनावर आदळली आणि तिन्ही वाहनांची साखळी धडक झाली.

या अपघाताला प्रविण लक्ष्मण मालप (वय ३९, रा. रायपाटण, ता. राजापूर) हा चालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून आरोपी चालक मालप याला किरकोळ दुखापत झाली आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3368436
Share This Article