GRAMIN SEARCH BANNER

आडीवरेतील नगरेश्वर मंदिरात १२५ वर्षांपूर्वीचा ताम्रपट सापडला; मंदिराच्या जीर्णोद्धाराचा इतिहास उजेडात

Gramin Varta
93 Views

राजापूर : तालुक्यातील आडीवरे येथील प्राचीन श्री नगरेश्वर महादेव मंदिरात सुमारे १२५ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ताम्रपट आढळून आला असून, त्यातून मंदिराच्या जीर्णोद्धाराची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. इ.स. १९०० मधील हा ताम्रपट इतिहास संशोधकांसाठी मौल्यवान ठेवा मानला जात असून, त्याद्वारे त्या काळातील धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेवरही प्रकाश पडत आहे.

मंदिराच्या सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लाकडी तुळईवर कोरलेला हा ताम्रपट देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असून त्यामध्ये दहा ओळींचा मजकूर आहे. या मजकुरात मंदिराच्या जीर्णोद्धाराची सविस्तर नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्या काळातील दाते वर्ग, सामाजिक बांधिलकी तसेच ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांचा धार्मिक कार्यातील सहभाग याची माहिती या ताम्रपटातून स्पष्ट होत आहे.

ताम्रपटावरील नोंदीनुसार, शालिवाहन शक १८२२, प्लवंग नाम संवत्सर, ज्येष्ठ वद्य पंचमी, रविवार दिनांक १७ जून १९०० रोजी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला होता. हा जीर्णोद्धार आडीवरे वाड्यातील नवेदर समूहातील भिडे कुलोत्पन्न वासुदेवराव यांनी केला होता. ते नारायणराव यांचे नातू व गोविंदराव यांचे पुत्र होते. त्या काळात वासुदेवराव हे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून कार्यरत असल्याचा उल्लेखही ताम्रपटात आढळतो.

ताम्रपटाच्या सुरुवातीला ‘श्री गजानन प्रसन्न’ आणि ‘श्री महाकाली प्रसन्न’ असे मंगलाचरण करण्यात आले असून, ‘श्री गौरीशंकराच्या प्रेरणेने’ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचा उल्लेख आहे. यावरून त्या काळातील शैव आणि शक्त उपासनेचा समन्वय दिसून येतो. तसेच शेवटी ‘सदाशिवार्पणमस्तु’ आणि ‘शुभ भवतु’ अशा पारंपरिक वाक्यांद्वारे कार्याचे दैवी अर्पण व्यक्त करण्यात आले आहे.

या ताम्रपटाचे संशोधन सागर मुंढे यांनी केले असून त्याचे वाचन अनिल दुधाणे यांनी केले आहे. या संशोधन कार्यात एम. एन. कामत यांचे सहकार्य लाभले असून माहिती संकलनाचे काम अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी हा ताम्रपट संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार असल्याचे सांगितले.

सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि समुद्रकिनाऱ्यालगत वसलेल्या राजापूर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, ब्रिटिश काळात राजापूर बंदर हे महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही वर्षांत तालुक्यात विविध ऐतिहासिक पुरावे आणि दस्तऐवज समोर येत असताना, या ताम्रपटामुळे राजापूरच्या इतिहासात आणखी एका महत्त्वपूर्ण अध्यायाची भर पडली आहे.

Total Visitor Counter

3364769
Share This Article