संगमेश्वर: मौजे परचुरी बौद्धजन मंडळ, मुंबई व स्थानिक संलग्न पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय ‘भव्य संयुक्त जयंती सोहळा २०२६’ नुकताच अत्यंत उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात संपन्न झाला. तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मौजे परचुरी येथील ‘धम्म चेतना बुद्धविहार’ येथे या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात विविध प्रबोधनात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली, ज्याला परिसरातील नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. हा संपूर्ण सोहळा मुंबई कार्यकारिणीचे अध्यक्ष जगदीश दादा जगनाथ पवार, चिटणीस संकेत संतोष पवार तसेच स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष नामदेव राया पवार, चिटणीस जनार्धन तुकाराम पवार आणि सल्लागार चंद्रकांत पवार, सूर्यकांत पवार, उदय पवार, निलेश पवार व अमर पवार यांच्या नेटके नियोजनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ध्वजारोहण व त्रिसरण पंचशील कार्यक्रमाने सोहळ्याची अधिकृत सुरुवात झाली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराचा परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. दुपारच्या सत्रात मुलांसाठी चित्रकलेसह विविध स्पर्धा पार पडल्या आणि त्यानंतर सर्व उपस्थितांनी धम्मभोजनाचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी दुपारनंतरचे सत्र महिलांसाठी विशेष ठरले, ज्यामध्ये ‘महिला सन्मान सोहळा व हळदीकुंकू’ कार्यक्रम आणि महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनात्मक खेळ अत्यंत रंगतदार पद्धतीने पार पडला. रात्रीच्या सत्रात झालेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ध्वजारोहण व त्रिसरण पंचशील कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आयोजित ‘विचारमंथन’ व्याख्यान सत्रात प्रमुख वक्ते आयु. दिनेश मारुती जाधव आणि प्रदीप जाधव यांनी उपस्थितांना महापुरुषांच्या विचारांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. दुपारच्या धम्मभोजनानंतर संध्याकाळी संपूर्ण परिसरातून एक भव्य आणि ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये अबालवृद्ध मोठ्या संख्येने सामील झाले होते. मिरवणुकीनंतर सायंकाळी सामूहिक दीपप्रज्वलन करण्यात आले. रात्रीच्या मुख्य सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि आभार समारंभ पार पडला. रात्रीच्या भोजनानंतर ‘भीमसंदेश संगीत जलसामंडळ, मौजे सायले’ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘मनोरंजन प्रबोधनात्मक जलसा’ या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली आणि या सुंदर प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.
या भव्य सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भास्कर पेरे पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
त्यांच्यासोबतच पंचायत समिती सभापती मा. सौ. शर्वरी प्रथमेश वेल्ये, माजी सदस्या जि.प. रत्नागिरी मा. सौ. रचनाताई महाडिक, पोलीस निरीक्षक मा. श्री. राजाराम चव्हाण, कुरढूंडाचे सरपंच मा. श्री. जमुरत अलजी आणि कोंडयेचे सरपंच मा. श्री. महेश देसाई यांनीही सोहळ्यास भेट देऊन महापुरुषांना अभिवादन केले. तसेच उपसरपंच मा. श्री. प्रदीप विश्राम चंदरकर, ग्रामसेवक परचुरी मा. श्री. अशोक भूते, पोलीस पाटील मा. श्री. सुधीर लिंगायत, माजी सैनिक मा. श्री. अनंत शिंदे, लेखक व मार्गदर्शक मा. श्री. दीपक लिंगायत, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत वेंद्रे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ परचुरी मा. श्री. सत्यवान वेंद्रे यांच्यासह अनंत कळंबटे (दाजी), गोविंद कळंबटे, संभाजी कळंबटे, विजय घडशी, दीपक गोणबरे आणि विजय लिंगायत आदी सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी निमंत्रक मौजे परचुरी बौद्धजन मंडळ, मुंबई व स्थानिक संलग्न पंचशील महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.






