GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: काकेवाडी-मोरोशी पायवाटेने जाताना काहीतरी चावल्याने चक्कर येऊन पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
365 Views

राजापूर: पायवाटेने घराकडे जात असताना पायाला अज्ञात जीव चावल्याने आणि त्यानंतर चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या काकेवाडी-मोरोशी येथील ६५ वर्षीय वृद्धाचा रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोतीराम शंकर पवार (वय ६५, रा. काकेवाडी, मोरोशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोतीराम पवार हे शेजाऱ्यांकडून पायवाटेने आपल्या घराकडे परतत होते. वाटेत अचानक त्यांच्या पायाला काहीतरी चावल्याची जाणीव त्यांना झाली. नेमके काय चावले हे पाहण्यासाठी ते हातात बॅटरी घेऊन तिथे शोधू लागले, मात्र त्याच वेळी त्यांना तीव्र चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर उजव्या हाताच्या खांद्याला मुकामार लागून त्वचा काळपट पडली होती.

घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र निखरे येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर १९ मे रोजी सकाळी त्यांना पाचल येथील खाजगी रुग्णालयात आणि तिथून पुढे रायपाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. रत्नागिरीत दाखल केले असता, १९ मे रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी मयत मोतीराम पवार यांची मुलगी रेश्मा रजनीकांत चव्हाण (रा. शिडवणे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी दिलेल्या खबरीवरून राजापूर पोलिसांनी २१ मे रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485537
Share This Article