GRAMIN SEARCH BANNER

कर्नाटकात नदीत शिंपले काढताना एकाच कुटुंबातील नऊ जणांचा बुडून मृत्यू

Gramin Varta
285 Views

बंगळुरू: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकल तालुक्यातील तट्टेहक्कलु नदी परिसरात दुर्दैवी घटना घडली. नदीत शिंपले (कप्पेचिप्पु) काढत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर चार जणांना सुखरूप वाचविण्यात आले आहे.

आणखी दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. मुख्यमंत्री यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

माहितीनुसार, पडुशिराली शारदहोळे गावातील १४ जण सकाळी तट्टेहक्कलु नदीत शिंपले काढण्यासाठी गेले होते. शिंपले काढत असतानाच अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहात व भोवऱ्यात अनेकजण वाहून गेले. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने चार जणांना वाचविण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल, स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथके नदीत सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.

पोलीसांच्या माहितीनुसार मृतांमध्ये एक पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख लक्ष्मी मादेव नायक (३८), लक्ष्मी शिवराम नायक (३९), मालती जट्टप्पा नायक (३८), मास्तम्मा मंजुनाथ नायक (४३), लक्ष्मी नायक, लक्ष्मी अण्णप्पा नायक (४४), ज्योती नायक (३७), उमेश मंजुनाथ नायक (४२) आणि मंजम्मा अशी झाली आहे. आणखी दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. नदीतून बाहेर काढलेले नऊ मृतदेह भटकल तालुका सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शोक व्यक्त केला. त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना मानवतावादी दृष्टिकोनातून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले की, काही लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवली जात आहे. बेपत्ता व्यक्ती सुखरूप सापडाव्यात, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Total Visitor Counter

3483721
Share This Article