GRAMIN SEARCH BANNER

दुरुस्तीच्या नावाखाली देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार २० दिवसांपासून बंद; काम रखडल्याने रुग्णांचे प्रचंड हाल

Gramin Varta
45 Views

देवरुख: येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका सर्वसामान्य व गरीब रुग्णांना सोसावा लागत आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली गेल्या २० दिवसांपासून रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे हे मुख्य द्वार बंद होऊन २० दिवस उलटले, तरीही प्रशासनाने अद्याप दुरुस्तीचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू केलेले नाही. काम सुरू न करताच मुख्य रस्ता अडवून धरल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे कमालीचे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे, मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यानंतर रुग्णांनी आत येण्यासाठी कुठल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, याबाबत रुग्णालयाच्या आवारात कोणतीही सूचना पाटी अथवा दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. माहिती फलकच गायब असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र संभ्रमावस्था निर्माण झाली असून, नेमके आत जायचे कुठून, असा संतप्त सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयात येणारे बहुतांश रुग्ण हे गरीब आणि दुर्गम भागातील असतात. आधीच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या या रुग्णांना मुख्य दार बंद असल्यामुळे संपूर्ण रुग्णालयाला वळसा घालून चाचपडत आत जावे लागत आहे. त्यातच आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांची तर यामुळे मोठी धांदल उडत आहे.

जर प्रशासनाला दुरुस्तीचे काम तातडीने सुरूच करायचे नव्हते, तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुख्य द्वार बंद करून रुग्णांना वेठीस धरण्याचा अट्टाहास का केला गेला, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एखादा साधा माहिती फलक लावण्याचे सौजन्यही रुग्णालयाने दाखवले नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णालयाने रखडलेले काम तात्काळ सुरू करावे किंवा काम सुरू होईपर्यंत मुख्य प्रवेशद्वार पूर्ववत खुले करून रुग्णांची होणारी ही ससेहोलपट थांबवावी, अशी तीव्र मागणी आता देवरुखवासीयांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3447405
Share This Article