‘वंदे भारत’ आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार
रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर होणारा मुसळधार पाऊस, घाटमार्ग आणि संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार असून, यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार आहे. परिणामी, मुंबई-गोवा दरम्यान धावणाऱ्या अनेक प्रमुख गाड्यांच्या वेळेत बदल होणार असून प्रवाशांचा प्रवास वेळ वाढणार आहे.
पावसाळ्यातील बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि रेल्वे वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर वेगमर्यादा निश्चित केली जाते. या विशेष वेळापत्रकाचा फटका मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या अतिवेगवान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला बसणार आहे. सध्या आठवड्यातून सहा दिवस धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/३०) पावसाळ्यात आठवड्यातून केवळ तीन दिवसच चालवली जाणार आहे. वंदे भारत सोबतच कोकण रेल्वे मार्गावरील प्रतिष्ठित अशा हजरत निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम सेंट्रलसह एकूण ८८ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा थेट परिणाम होणार आहे.
या बदललेल्या वेळापत्रकामुळे कोकणकन्या, तेजस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा, दुरांतो, हमसफर, मरूसागर, तुतारी, गोवा संपर्क क्रांती आणि मंगळुरू एक्सप्रेस यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गाड्यांची वाहतूक प्रभावित होणार आहे. पावसाळ्यात रेल्वेचा वेग नियंत्रित केला जात असल्याने गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रावर गाड्यांच्या बदललेल्या वेळांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






