दापोली : तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर लोखंडी शिगेने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तत्परतेने कारवाई करत आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर का टाकला?” याच किरकोळ कारणावरून मुख्य आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह फिर्यादी व जखमी तरुणाशी वाद घालून आधी शिवीगाळ केली आणि त्यानंतर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी तेथे पडलेली लोखंडी शिग वापरून दोघांवर जीवघेणा हल्ला चढवला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या १० ते १५ मुलांनीही या दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या भीषण मारहाणीत फिर्यादी आणि जखमीच्या डोके, तोंड, हात, पाय व पाठीवर गंभीर दुखापती झाल्या असून सध्या त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर या घटनेतील संबंधित साक्षीदारांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जैन अस्लम हुनैरकर (वय २२), मुफीज जावेद सोलकर (वय २३), सलाह हसन कोडविलकर (वय १९), नबिल निसार काझी (वय १९), जैब ताजुद्दिन जमादार (वय २६), हर्षद अझीम हुनेरकर (वय २५), नाईफ आरिफ श्रीवर्धनकर (वय १९) आणि एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश असून हे सर्व आरोपी हर्णे बंदर मोहल्ला येथील रहिवासी आहेत. यापैकी पहिल्या पाच आरोपींना २८ मे रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या चौकशी दरम्यान हर्षद आणि नाईफ या अन्य दोघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही २९ मे रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि दापोली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकाने पार पाडली.





