देवरुख: देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून आलेल्या एका वॅगनआर कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून हे सर्व कलाकार पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने (क्रमांक MH 02 JP 9493) निवळीच्या दिशेने प्रवास करत होते. निवे बुद्रुक परिसरात आले असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर (क्रमांक MH 08 G 1559) पाठीमागून प्रचंड वेगाने आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा पार चक्काचूर झाला.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर आणि संतोष सांडिम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमध्ये आणि डंपरखाली अडकलेल्या जखमींना अत्यंत शिताफीने बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच ‘भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका’ सेवेचे चालक मनोज पांचाळ यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मृत्यू झालेल्या नमन कलाकाराची ओळख अद्याप पटलेली नाही. रुग्णालयात दाखल इतर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची नोंद करून देवरुख पोलिसांनी या अपघात प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.






