मंडणगड: तालुक्यातील वाल्मिकीनगर, बाणकोट येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन महिलांना लाकडी शिडी आणि फावड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धेसह त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून, संशयितांनी घराची तोडफोड करत साहित्याचेही नुकसान केले आहे. याप्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ताहीरा अहमद शेख (वय ४०, रा. वाल्मिकीनगर, बाणकोट) आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये जमीन जागेवरून जुना वाद आहे. १ जून २०२६ रोजी रात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ताहीरा शेख या आपल्या घरासमोरील रस्त्याच्या कामाचा पडलेला माल कामगारांना विचारून घराच्या पायरीला लावत होत्या. याच वेळी बाणकोट पटेल मोहल्ला येथील रहिवासी असलेले संशयित बिलाल साठे, माज साठे, साद साठे आणि साहीम साठे हे सर्व तिथे आले. त्यांनी ‘तुम्ही पायरी बनवायला कोणाची परवानगी घेतली, ही जागा आमची आहे’ असे म्हणून फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संशयितांनी काठी आणि दगडाने ताहीरा यांच्या घराची कौले फोडली. तसेच बाजूला असलेली चिऱ्याची पडवी तोडून त्यातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. या दरम्यान संशयितांनी घरातील छोट्या लाकडी शिडीने ताहीरा यांना बेदम मारहाण केली. तर संशयित माज साठे याने घरातील फावडे फेकून मारल्याने ताहीरा यांची ७० वर्षीय वृद्ध आई रजिया अहमद शेख यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात फिर्यादी ताहीरा यांच्याही डोक्याला आणि छातीला मुका मार लागला आहे.
या घटनेनंतर बाणकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बिलाल साठे, माज साठे, साद साठे आणि साहीम साठे या चारही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२) आणि ३(५) (पूर्वीचे आयपीसी ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२६, ३४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






