लांजा: तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वृक्षतोडीची प्रकरणे बंद असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटी असल्याचे चित्र आहे. लांजा तालुक्यातील अनेक भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, जागोजागी लाकडांचे प्रचंड ढीग नजरेस पडत आहेत. त्यामुळे तालुक्यात खरोखरच वृक्षतोड बंद आहे की हा केवळ कागदोपत्री देखावा आहे, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या बेकायदेशीर कृत्याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभार यामुळेच लाकूड तस्करांचे धाडस वाढले असून तालुक्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे.
सध्या पावसाळा तोंडावर आल्याने जंगलातून तोडलेला हा अवाढव्य लाकूड साठा तातडीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तस्करांची लगबग सुरू आहे. लांजा तालुक्यातून हा सर्व लाकूड साठा कोल्हापूर आणि सांगलीच्या दिशेने राजरोसपणे वाहून नेला जात आहे. लांजा-कोल्हापूर मार्गावर दिवस असो वा रात्र, लाकडाने गच्च भरलेले मोठे ट्रक उघडपणे ये-जा करताना दिसत आहेत. जर प्रशासनाच्या दाव्यानुसार वृक्षतोडीची प्रकरणे आणि परवाने खरोखरच बंद असतील, तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही वृक्षतोड कशी होत आहे आणि हा लाकूड साठा कोणाच्या आशीर्वादाने वाहतूक केला जात आहे, असा टोकदार प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.






