रत्नागिरी: कोकणची समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक लोककला ‘नमन’ जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी ‘काय समाजलिव’ डिजिटल पेजच्या वतीने एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “कोण होणार कोकणाचा पहिला रीलबाज” असे या स्पर्धेचे नाव असून, ही स्पर्धा पूर्णपणे डिजिटल माध्यमावर रंगणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारे पत्रक नुकतेच जारी करण्यात आले असून, यात स्पर्धेची रूपरेषा, बक्षिसे आणि नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही प्रवेश फी नसून सहभाग पूर्णपणे मोफत आहे. कोकण मर्यादित असलेल्या या रील स्पर्धेत वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. स्पर्धकांना ‘नमन – लोककला कोकणाची’ या विषयावर किमान १ मिनिट ते कमाल ३ मिनिटांचा रील तयार करावा लागेल. रील बनवताना रत्नागिरी जिल्ह्यातील बोलीभाषेला प्राधान्य दिले जाईल, मात्र गरजेनुसार प्रमाण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापरही करता येईल. स्पर्धकांनी तयार केलेला रील त्यांच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून १६ जून २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेपर्यंत ‘kayy_samajleev’ या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजला डीएम (DM) करणे आवश्यक आहे. रील अपलोड करताना रत्नागिरी जिल्हा हे लोकेशन निवडून, पत्रकात दिलेल्या अधिकृत हॅशटॅगचा वापर करणे बंधनकारक आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला २५,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला २०,००० रुपये, तर तृतीय क्रमांकाला १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक, चषक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. याशिवाय प्रत्येकी ५,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत. मुख्य बक्षिसांवरीच सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम लेखन, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्तम छायाचित्रण यासाठी प्रत्येकी ५०१ रुपये तर सर्वोत्तम प्रेक्षक पसंत रीलसाठी ५००१ रुपयांचे विशेष पारितोषिक चषक आणि प्रशस्तीपत्रकासह दिले जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रामुख्याने रीलचे कथानक, दिग्दर्शन, अभिनय, चित्रीकरण आणि दृश्य यांच्या आधारावर केले जाईल. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुख्य आयोजक ‘काय समाजलिव’चे अध्यक्ष प्रणय सुहास पाटील हे असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ७४९९१३४४६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






