GRAMIN SEARCH BANNER

खेड: चोरवणेचा सुपुत्र सार्थक जाधव वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी बनला नॉर्वेमध्ये पायलट

Gramin Varta
137 Views

खेड : तालुक्यातील चोरवणे गावातील युवक सार्थक उमेश जाधव याने अवघ्या २० व्या वर्षी पायलट बनण्याचे यश संपादन करत आपल्या कुटुंबासह संपूर्ण पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल केले आहे. लहानपणापासून उराशी बाळगलेले वैमानिक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत सार्थकने तरुणाईसमोर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचा आदर्श निर्माण केला आहे.

चोरवणे या ग्रामीण भागातील वातावरणात वाढलेल्या सार्थकने शिक्षणासाठी आणि करिअरसाठी मोठी ध्येये ठेवली होती. त्याचे वडील उमेश सीताराम जाधव हे अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त नॉर्वेमध्ये वास्तव्यास असून कुटुंबाच्या पाठबळामुळे सार्थकला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य झाले. संपूर्ण शिक्षण नॉर्वेमध्ये पूर्ण करत असतानाच त्याने वैमानिक होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले.

पायलट होण्यासाठी आवश्यक असलेले विशेष प्रशिक्षण, कठोर अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा यशस्वी मेळ घालत सार्थकने तीन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. अथक मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्याने वैमानिक होण्याचा मान मिळवला. या यशामागे वडील उमेश जाधव आणि आई मयुरी जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

सार्थकच्या यशाची बातमी समोर आल्यानंतर चोरवणे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून जागतिक स्तरावरील करिअरची वाट निवडत सार्थकने आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली आहे.

चोरवणे गावासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे सार्थक जाधवने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

Total Visitor Counter

3484261
Share This Article