रत्नागिरी/अजय सावंत : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील सुरू असलेल्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, मुसळधार पावसातच काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. नाचणे येथील गणेश कॉलनी ते टीआरपी परिसरात मंगळवारी रात्री पाऊस सुरू असतानाच काँक्रिट टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्गाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारपासून रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी आणि काँक्रिट यांचा थेट संपर्क होत असताना काम सुरू ठेवण्यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारला जाणारा महामार्ग जर पावसातच घाईघाईने तयार केला जात असेल, तर त्याच्या टिकाऊपणाची हमी कोण देणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महामार्गाच्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही, याबाबतही शंका व्यक्त होत आहेत. कामाच्या ठिकाणी दर्जा नियंत्रणाची यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पावसात केलेले काँक्रिटीकरण भविष्यात महामार्गाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे ठरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदारांवर राहील, असा इशाराही वाहतूकदार आणि नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, या कामाची तातडीने तपासणी करून वास्तव जनतेसमोर आणावे, अन्यथा निकृष्ट कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
रत्नागिरीत भरपावसात महामार्गाचे काँक्रिटीकरण; काम उरकण्याच्या नादात निकृष्ट होत असल्याचा नागरिकांचा आरोप






