पोलिसात तक्रार, मात्र कार्यवाही नाही
गुहागर : तालुक्यातील एका वृद्ध महिलेला शासनाची पेन्शन योजना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे घेण्यात आली आणि त्याच कागदपत्रांचा गैरवापर करून तिची जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गुहागर तालुक्यातील चिखली येथील सुमारे ७० वर्षीय राधाबाई कृष्णा साळवी यांनी याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीनुसार, राधाबाई साळवी या वृद्ध असून त्यांना कोणताही आधार नसल्याने शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत दीपक धनाजी शिर्के याने पेन्शन योजना मंजूर करून देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
पेन्शनच्या कामासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील, असे सांगून शिर्के याने राधाबाई यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रांसह इतर कागदपत्रे घेतल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, पेन्शन मिळवून देण्याच्या नावाखाली घेतलेल्या याच कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, काही काळानंतर राधाबाई यांना त्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी विचारणा केली असता, पेन्शनचे काम सुरू असून लवकरच पेन्शन सुरू होईल, असे सांगून त्यांना पुन्हा आश्वस्त करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या जमिनीबाबत वेगळाच व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणात दीपक धनाजी शिर्के तसेच त्यांची पत्नी प्राजक्ता शिर्के यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. राधाबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांच्या अज्ञानाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांच्या सही-अंगठ्याचा वापर करून कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
राधाबाई यांनी तक्रारीत नमूद केलेल्या गट क्रमांक १६३२ या जमिनीबाबतही गंभीर आरोप केले आहेत. आपली जमीन परस्पर नावावर करून घेऊन आपली आर्थिक फसवणूक करण्यात आली असून, या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, वृद्ध आणि अशिक्षित महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन सरकारी पेन्शन मिळवून देण्याच्या नावाखाली जमीनच काढून घेण्याचा आरोप समोर आल्याने हे प्रकरण केवळ जमीन व्यवहारापुरते मर्यादित राहत नाही. सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली एखाद्या वृद्ध महिलेची फसवणूक होत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
या तक्रारीत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारीत नमूद केलेली कागदपत्रे आणि जमीन व्यवहाराची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आता या तक्रारीची गुहागर पोलिसांकडून कशा पद्धतीने दखल घेतली जाते, संबंधित जमीन व्यवहाराची कागदपत्रे तपासली जातात का, वृद्ध महिलेच्या सही-अंगठ्याचा वापर नेमका कसा झाला आणि पेन्शनच्या नावाखाली कोणता व्यवहार करण्यात आला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका वृद्ध महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेतला गेला असेल, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.





