‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’: रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर

Gramin Varta
235 Views

सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’ उभारणार: पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा ‘भारत माता की जय’चा निनाद..हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने फुललेला राष्ट्रभक्तीचा सागर..’आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत आज रत्नागिरीनगरी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. निमित्त होते, सैनिकांच्या सन्मानार्थ शहरातून काढण्यात आलेल्या एका दिमाखदार आणि भव्य तिरंगा रॅलीचे..!

शहरातील मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॕलीचा शुभारंभ झाला. पोलीस बँड पथकाने वाजवलेले ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत यामुळे सभोवतालचे वातावरण कमालीचे भारावून गेले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी रत्नागिरीचे रस्ते दुमदुमून गेले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत तरुणाईपासून ते वयोवृद्ध, दिव्यांगांपर्यंत सर्वच रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,  जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित  होते. रॕली शासकीय रुग्णालयाजवळ आल्यावर भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.देशभक्तीपर गीतांच्या तालावर पावले टाकत, हा जनसागर जयस्तंभ चौकात आला. तिथे पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या शब्दांतून जिल्ह्याच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान ओसंडून वाहत होता.
ते म्हणाले, “रत्नागिरीची भूमी ही शिवछत्रपतींच्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, लोकमान्य टिळकांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज सारे राजकीय मतभेद विसरून रत्नागिरीकर ज्या एकजुटीने तिरंग्याखाली उभे आहेत, ते संविधानाचे आणि देशप्रेमाचे सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. संविधानाचा आदर कसा करावा, हे संपूर्ण देशाने माझ्या रत्नागिरीकडून शिकावे!”

सैनिकांसाठी ऐतिहासिक घोषणा

देशाच्या सीमेवर खडा पहारा देणाऱ्या आणि निवृत्तीनंतर आपल्यातच वावरणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पालकमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.पुढील वर्षापासून १५ ऑगस्टला माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला जाईल.

येत्या १४ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीपूर्वी रत्नागिरीत दिमाखदार ‘सैनिक उद्यान’ उभारले जाईल. जिल्हा सैनिक भवन’ देखील उभारले जाईल. त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल.ही वास्तू म्हणजे देशातील तमाम सैनिकांना रत्नागिरीची मानवंदना असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पुढील वर्षी ही रॅली तब्बल १ लाख नागरिकांच्या उपस्थितीत निघेल, असा संकल्पही त्यांनी सोडला.
स्वतःचा जीव धोक्यात घालून तणव याचे प्राण वाचवणाऱ्या आयुष कामेरकर, अनुप कामेरकर, सार्थक जठार, भरत जठार आणि आयुष गांधी या साहसी युवकांना यावेळी मानाचा ‘तिरंगा’ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

विविध शाळांचे विद्यार्थी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही तिरंगा रॅली केवळ एक सोहळा न राहता, प्रत्येक रत्नागिरीकराच्या मनात राष्ट्रप्रेमाची एक अखंड ज्योत प्रज्वलित करणारा एक ऐतिहासिक क्षण ठरली.

Total Visitors :
4698231
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *