लांजा/अरबाज नेवरेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा-वाकेड घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने हरियाणा येथील जीप कंपास वाहन अंदाजे ७० फूट खोल दरीत कोसळले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत वाहनातील महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वाकेड घाटातील तीव्र वळणावरून वाहन पुढे जात असताना चालकाचा वळणाचा अंदाज चुकला. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळले. वाहन दरीत पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याची पाहणी केली. पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे, पोलीस कॉन्स्टेबल उमाजी बजागे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, ११२ क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसह स्थानिकांच्या मदतीने दरीत अडकलेल्या दोन्ही प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना ११२ वाहनातून लांजा येथे उपचारासाठी नेण्यात आले. दोन्ही प्रवाशांची प्रकृती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सुमारे ७० फूट खोल दरीत गेलेले वाहन बाहेर काढणे हे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. यासाठी मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री सुमारे अकराच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने जीप दरीतून बाहेर काढण्यात आली. यावेळी हायवे वाहतूक पोलीस आणि ११२ पथक घटनास्थळी उपस्थित होते.
वाहन बाहेर काढण्याच्या मोहिमेत जिजाऊ संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ आणि निलेश जाधव यांनीही मदतीचा हात दिला. पोलिसांसह स्थानिकांच्या सहकार्याने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढून वाकेड पेट्रोल पंप परिसरात ठेवण्यात आले.
या अपघातात दोन्ही प्रवाशांचा जीव वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र वाकेड घाटातील तीव्र आणि धोकादायक वळणांमुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
ब्रेकिंग: लांजातील वाकेड घाटात खोल दरीत जीप कोसळली
Leave a Comment





