भाजपने केला राज्यात सत्ता स्थापनेचा दावा
दिल्ली: मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी 9 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारीला मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. मात्र, बुधवारी भाजप आणि एनडीएच्या नेत्यांनी वाय. खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. मणिपूरमधील भाजप आमदारांच्या मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत वाय. खेमचंद सिंह यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. राज्यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा सूत्रानुसार नवीन सरकार स्थापन करण्याचा मार्ग भाजपने काढला आहे. राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर लवकरच वाय. खेमचंद सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा शपथविधी होणार आहे.
मैतेई आणि कुकी समाजातील जातीय हिंसाचारामुळे अस्वस्थ झालेल्या मणिपुरमध्ये नवीन सरकारची स्थापना ही शांतता पुनर्स्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे. बुधवारी वाय. खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप व एनडीएतील घटक पक्षांचे नेते राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. या वेळी भाजप नेते संबित पात्रा आणि तरुण चुगही उपस्थित होते. राज्य विधानसभेचे अध्यक्ष तसेच मागील सरकारमधील मंत्री असलेले वाय. खेमचंद सिंह हे मणिपुरचे 13वे मुख्यमंत्री ठरणार आहेत. ते मैतेई समाजातील असून त्यांची ओळख एक उदारमतवादी नेते म्हणून आहे. मणिपुरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू होती.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 60 सदस्यीय विधानसभा निलंबित करण्यात आली होती. विधानसभेचा कार्यकाळ 2027 पर्यंत आहे. सध्याच्या सभागृहात भाजपचे 37 आमदार आहेत. राज्यातील 2022 च्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या 32 उमेदवारांनी विजय मिळवला होता. जनता दल (युनायटेड) ने 6 जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी 5 आमदार नंतर भाजपमध्ये सहभागी झाले. इतर आमदारांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे सहा, नगा पीपल्स फ्रंटचे 5, काँग्रेसचे 5, कुकी पीपल्स अलायन्सचे 2, संयुक्त जनतादलाचा एक आणि 3 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. एका विद्यमान आमदाराच्या निधनामुळे सध्या एक जागा रिक्त आहे.
मणिपूरमध्ये वर्षभरानी हटवली राष्ट्रपती राजवट








