संगमेश्वर: तालुक्यातील नावडी येथील ग्रामदैवत श्री निनावी देवीचा शिमगोत्सव आणि शिंपणे उत्सव अत्यंत उत्साहात आणि शांततामय वातावरणात पार पडला. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री निनावी देवी प्रासादिक मंडळ, संगमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारी, तेली आणि नाभिक ज्ञाती बांधवांसह स्थानिक मित्र मंडळ व तरुणाईचा लाभलेला उत्स्फूर्त सहभाग. सर्वांच्या एकजुटीमुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
उत्सवादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल आणि होमगार्डनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाच्या या उत्तम सहकार्याबद्दल श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष व मानकरी श्री. दत्ताराम बावा सुर्वे यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.






