GRAMIN SEARCH BANNER

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती; पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

Gramin Varta
250 Views

मुंबई:बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे सर्वोच्च पद एका महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे मंगळवारी मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. महापौर रितू तावडे यांच्यासह आता आयुक्तपदी भिडे यांची वर्णी लागल्याने मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ अवतरले आहे.

आयुक्तपदासाठी डॉ. मिलिंद म्हैसकर, डॉ. संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबईत ‘मेट्रो वूमन’ अशी ओळख असून, मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद, शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही अत्यंत कार्यक्षमतेने जबाबदारी सांभाळली आहे.
अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या भिडे या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मानल्या जातात.

त्यांच्या या नव्या नियुक्तीनंतर आता मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड होणार आणि मुंबई मेट्रोची धुरा कोणाकडे जाणार, याबाबत प्रशासकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश निघणार असून, त्यानंतर त्या तातडीने पदभार स्वीकारतील. त्यांच्या रूपाने मुंबईला एक अनुभवी आणि शहराच्या प्रश्नांची जाण असलेली पहिली महिला आयुक्त मिळाली आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article