रायगड : माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजवर सोमवारी रात्री एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यात रायगड पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले असून, संशयित आरोपीला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेतील मृत तरुणीची ओळख पटली असून, पल्लवी मोरे (२२, रा. वडगाव बौद्धवाडी, ता. माणगाव) असे तिचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री लोणेरे येथील ओमकार लॉजिंगमध्ये पल्लवीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. संशयित आरोपी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असून, त्याने प्रेम प्रकरणातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
घटनेनंतर फरार झालेल्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी आणि रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे माणगाव परिसरात संतापाची लाट असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.






