GRAMIN SEARCH BANNER

मुख्य सचिवांच्या आश्वासनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह प्रलंबित विविध १८ मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मागे घेण्यात आला.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांचे इतिवृत्त मिळाल्यानंतर तसेच सकारात्मक आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीकडून घेण्यात आला.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे राज्यातील महसूल विभागाच्या कार्यालयावर सर्वाधिक परिणाम झाला. मुद्रांक नोंदणीसह जमीन तसेच घर खरेदी व्यवहार, विवाह नोंदणीचेही काम ठप्प झाले होते. अखेर चौथ्या दिवशी या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आले.

समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले की, सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबतही सरकारने आश्वासन दिले असून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील जनतेची कामे ठप्प होऊ नयेत, सरकारी सेवांवर परिणाम होऊ नये म्हणून हा संप मागे घेण्याचा निर्णय घेत आहे. या संदर्भात आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सर्व संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3485444
Share This Article