GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: बौद्धिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन आवश्यक : आ.शेखर निकम

Gramin Varta
3 Views

चिपळूण: बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून चरित्र वाचनातून संघर्षमय व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.चिपळूणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते.यावेळी ‘शब्द माझा मृदंगी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, विकी लवेकर, शशिकांत मोदी, मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर आदी उपस्थित होते.श्री. निकम म्हणाले, आजच्या काळात वाचनाचे प्रमाण कमी होत असताना एआय तंत्रज्ञानाची गरज शालेय स्तरापासून कितपत आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. स्व. गोविंदराव निकम यांनी ‘गाव तिथे वाचनालय’ ही संकल्पना राबवली होती. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. बिहारमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात, कारण त्यांना लहानपणापासून त्यासाठी तयार केले जाते.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी कै. रमेश चिपळूणकर (गुरुजी) यांच्या माध्यमातून वाचनालयाशी जुळलेला संबंध सांगितला. वाचनालयाला नगरपरिषद आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.धनंजय चितळे यांनी “मुलं वाचत नाहीत, कारण त्यांना वाचणारे आई-वडील दिसत नाहीत,” अशी खंत व्यक्त करत अधिकाधिक नागरिकांनी वाचनालयाचे सदस्य व्हावे, असे आवाहन केले.विद्यार्थिनी अनन्या खेराडे हिने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात प्रदीप पवार यांनी रौप्यमहोत्सवी उपक्रमांचा आढावा घेतला. विशेषांकाबाबत संपादक धीरज वाटेकर यांनी माहिती देत ‘वाचनालयांचे भवितव्य’ या विषयावरील संदर्भीय लेखांचा परिचय करून दिला. राष्ट्रपाल सावंत यांनी वाचनालयाच्या उभारणीचा प्रवास मांडला, तर डॉ. यतीन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष सकपाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन उद्घाटन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सूत्रसंचालन अमित ओक यांनी केले, तर आभार प्राची जोशी यांनी मानले.

Total Visitor Counter

3368725
Share This Article