पालकमंत्री उदय सामंत यांची सागवेतील संघर्ष मेळाव्यात ग्वाही; ‘तुमच्या मनात जे आहे, तेच होईल, निश्चिंत रहा’
राजापूर : तालुक्यातील नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना, या प्रकल्पासाठी ७ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आलेली जनसुनावणी रद्द करण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ‘तुमच्या मनात जे आहे, तेच होईल. तुम्ही निश्चिंत रहा,’ असा शब्दही त्यांनी स्थानिकांना दिला.
बॉक्साईट प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार आणि ग्रामस्थांसह विविध राजकीय पक्षांनी एकजूट दाखविली असून, या पार्श्वभूमीवर रविवारी सागवे येथे सर्वपक्षीय प्रकल्पविरोधी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन सागवे हायस्कूल येथे झालेल्या या मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.
यावेळी राजापूरचे आमदार किरण सामंत, सभापती नंदिनी कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले, उबाठाचे तालुका प्रमुख कमलाकर कदम, ॲड. शशिकांत सुतार यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिकांचा या प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेता ७ सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी होणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ‘अनेकांनी आपल्या भाषणात माझा उल्लेख संकटमोचक असा केला. जर मी राज्याचा संकटमोचक असेन, तर आपल्या जिल्ह्यावर संकट येणार नाही, याची खात्री तुम्हाला असायला हवी. तुमच्या मनात जे आहे, तेच होईल,’ असे सांगत त्यांनी स्थानिकांना दिलासा दिला.
‘स्थानिक आमदार किरण सामंत यांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि ते तुमच्यासोबत आहेत. पालकमंत्री म्हणून शासनाची भूमिका मांडण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा. ७ तारखेची जनसुनावणी होणार नाही आणि प्रकल्पाबाबतही तुमच्या मनात जे आहे, तेच होईल,’ असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले.
कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत सामंत म्हणाले की, भविष्यात कोणत्याही प्रकल्पासाठी संघर्ष करण्याची वेळ जनतेवर येणार नाही. जबरदस्तीने कुठेही काही केले जाणार नाही. जनतेला जे हवे आहे, ते करण्याची सरकारची भूमिका आहे. ‘मी सरकारमध्ये असलो तरी जनतेशी बांधील आहे. आम्हीही याच मातीतले आहोत. त्यामुळे कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकल्पाबाबत कंपनीच्या मालकाशीही चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. संबंधित कंपनीच्या मालकाला आता या ठिकाणी प्रकल्प करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे स्पष्ट करत, स्थानिकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणपूरक प्रकल्पांचे स्वागत करा
कोकणात नव्याने विविध प्रकारचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रकल्प येत असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. भविष्यात कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्प आणले जातील आणि अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. उद्योजकांच्या बैठकीतही आपण हीच भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून काजू बोंडापासून सिरप निर्मितीसारख्या स्थानिक आणि शाश्वत उद्योगांना चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘लाडकी बहीण’ योजना कधीही बंद होणार नाही, त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
‘प्रकल्पाला आमचाही विरोध; मात्र थोडी सबुरी आवश्यक’
आमदार किरण सामंत यांनीही बॉक्साईट प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. ‘मी कायमच माझ्या मतदारसंघातील जनतेसोबत आहे. मला कोणतेही राजकारण करणे आवडत नाही. माझी भूमिका रोखठोक असते. त्यामुळे कुणी राजकारण करत असेल तर त्याला बळी पडू नका,’ असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सागवे येथे आणले असून, ते केवळ जनतेसाठीच आले असल्याचेही किरण सामंत यांनी नमूद केले. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागतो. ‘कुणी आले म्हणजे लगेच झेरॉक्स कॉपी काढल्यासारखे काम होत नाही. त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो,’ असे सांगत त्यांनी स्थानिकांना सबुरीचा सल्ला दिला.
या संघर्षाला आणि संघर्ष मेळाव्याला निश्चित यश मिळेल. काही गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात. पालकमंत्री आमच्या मागणीचा विचार करून जनतेला हवा तसा निर्णय घेतील, असा विश्वासही किरण सामंत यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार
मेळाव्यात ॲड. शशिकांत सुतार यांनी प्रास्ताविकातून संघर्ष मेळाव्याच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेला भोगावे लागणारे संभाव्य परिणाम याबाबत त्यांनी भूमिका मांडली.
नाणारचे माजी सरपंच ओंकार प्रभूदेसाई यांनी आमदार किरण सामंत यांनी घेतलेली जनतेची बाजू आणि दिलेले पाठबळ हे संघर्षासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत ‘हा प्रकल्प आम्हाला नकोच,’ अशी ठाम भूमिका मांडली.
नाणारचे माजी सरपंच मजीद भाटकर यांनी मच्छीमार समाजही प्रकल्पविरोधात एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. स्थानिक जमीनमालक आणि शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी देणार नसल्याचे शपथपत्र केल्यानंतर मच्छीमार समाजही एकदिलाने या संघर्षात सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निमेष वालम यांनी भविष्यात तालुक्यात कोणते प्रकल्प हवेत, याची यादी तयार करून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असे प्रकल्प आणण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी उबाठाचे तालुका प्रमुख कमलाकर कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सोनाली ठुकरूल, संजय राणे, सुबोध मांजरेकर, काशिनाथ गोरले, नंदकुमार कुलकर्णी, वासुदेव मासये, रवींद्र अवसरे, मनोहर धुरी, समीर अवसरे आदींनी विचार मांडत बॉक्साईट प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला.
मेळाव्यास स्थानिक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
जनसुनावणी तिसऱ्यांदा रद्द
नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरातील बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाची चर्चा सन २०१७-१८ पासून सुरू आहे. प्रकल्पाला स्थानिकांचा सातत्याने विरोध होत असून यापूर्वी दोन वेळा जनसुनावणी रद्द झाली आहे. आता पालकमंत्री उदय सामंत यांनी ७ सप्टेंबर रोजी नियोजित जनसुनावणी रद्द होणार असल्याचे जाहीर केल्याने या प्रकल्पाची जनसुनावणी तिसऱ्यांदा रद्द होणार आहे.
दरम्यान, जनसुनावणी रद्द करण्याच्या घोषणेनंतर आता शासनाकडून प्रकल्पाबाबत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







